दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्यासाठी प्रताप सरनाईक यांचा पहाणी दौरा

मीरा-भाईंदर दि ११ :– मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यान नागरिकांच्या दीर्घकाळ मागणीला प्रतिसाद देत दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनामार्फत झाल्यानंतर आज परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी दहीसर टोल वाका आणि वर्सोवा पुलासमोरील नर्सरी परिसराचा (नवीन टोल नाका स्थळ) पहाणी दौरा केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून, दिवाळीपूर्वीच टोल नाका नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पहाणी दौऱ्यानंतर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले,
“दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. इंधनाचा अपव्यय, प्रवासात होणारा उशीर आणि प्रदूषण या सगळ्याचा त्रास १५ लाखांहून अधिक स्थानिक नागरिकांना होत होता. त्यामुळेच हा टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”
या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईलच, शिवाय मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांना टोलमुक्त प्रवासाची शिवसेनेच्यावतीने दिवाळीपूर्वीच भेट मिळेल, असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. पहाणी दौऱ्यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) व्यवस्थापकीय संचालक सुहास चिटणीस, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पोलीस आयुक्त निकेत कौशिक, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक वीरकर त्याचसोबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.ML/ML/MS