उ.प्रदेशातील विद्यार्थ्यांना येतो हिंदीच्या पेपरचा मोठा ताण

लखनौ, दि. १० : उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2026 पासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये हिंदी विषयाचा पेपर पहिल्या दिवशी घेतला जाणार नाही. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे हिंदी विषयामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण. हिंदी हा स्कोरिंग विषय असूनही, पहिल्या दिवशी परीक्षा असल्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या एकूण परीक्षेच्या कामगिरीवर होतो. पहिल्या दिवशी परीक्षा केंद्र, प्रश्नपत्रांचे वितरण, सीटिंग प्लॅन यामुळे निर्माण होणाऱ्या गोंधळात विद्यार्थ्यांना मानसिक दबाव जाणवतो. त्यामुळे हिंदीसारख्या महत्त्वाच्या विषयातही अनुत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते.
या पार्श्वभूमीवर मंडळाने निर्णय घेतला आहे की पहिल्या दिवशी हिंदी ऐवजी सोपा आणि ट्रेड विषयाचा पेपर घेतला जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वातावरणाशी जुळवून घेता येईल. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि पुढील विषयांची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. शिवाय, परीक्षेच्या दिवसांमध्ये अंतर वाढवले जाणार असून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी अधिक वेळ मिळेल. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले असून तो विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.