यंदाची दिवाळी ठरणार मिरा-भाईंदरवासियांसाठी गोड !

मीरा-भाईंदर दि ८ : —
मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या सुमारे २० महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री प्रताप इंद्राबाई बाबुराव सरनाईक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नांनी मिरा-भाईंदरसाठी शासनाकडून १८०० कोटी विविध विकासकामांसाठी आणि ९०० कोटी रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्याच निधीच्या मार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे पूर्णत्वास आलेली व लवकरच पूर्ण होणारी कामे उद्घाटनासाठी निश्चित करणे हा होता.
मंत्री सरनाईक यांच्या मार्फत महानगरपालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले गेले, सोबतच १० ऑक्टोबरपर्यंत रखडलेली सर्व कामे पूर्ण व्हावी आणि तांत्रिक प्रक्रियेत अडकलेली कामे एका महिन्याच्या आत मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महानगरपालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होऊ शकते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी सूचना दिली आहे. काही कामे निधी अभावी थांबली आहेत; त्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करून निधी मंजूर करून कामे पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेबद्दल सांगताना मंत्री सरनाईक म्हणतात की,
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण हा मिरा-भाईंदरसाठी अभिमानाचा क्षण आहे. दिवाळीच्या निमित्ताने कलाप्रेमींना ही एक मोठी भेट ठरेल. तसेच प्रमोद महाजन कलादालनाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे. १० डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सोबतच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी स्मशानभूमी, तलाव, समाजभवन, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक अशा सर्व विकासकामांना गती देण्याचा आमचा निर्धार आहे. MMRDA, महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी वेळेत काम पूर्ण करून विकासाची गती नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवावी, हीच आमची अपेक्षा आहे.”ML/ML/MS