लोकल ट्रेनसाठी क्यूआर तिकीट बंद

मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगरीय रेल्वेमधील प्रवाशांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने क्यूआर कोडद्वारे (QR codes) मोबाईल तिकीट बुकिंग (ticket booking) सेवा बंद केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे जिओफेन्सिंग क्षेत्रात क्यूआर स्कॅन करून तिकीट बुक करता येणार नाही.(UTS on Mobile App)
रेल्वेचे पश्चिम विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले की,२०२३ पासून क्यूआर कोडचा गैरवापर वाढल्याचे निदर्शनास आले होते.
काही प्रवाशांनी सर्व स्थानकावरील क्यूआर कोड डाऊनलोड करून ठेवले होते आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतरच तिकीट बूक करत होते. यामुळे टीसीला फसवता येत होते. युटीएस ऑन मोबाईल अॅपवरून क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सुविधा आता पूर्णतः थांबवली आहे. नवीन नियमांनुसार, प्रवाशांना फक्त पेपरलेस जीपीएस आधारित तिकीट किंवा स्थानकावरून हार्ड कॉपी स्वरूपातील तिकीट काढता येईल. तिकीट बुकिंग फक्त तेव्हाच शक्य असेल जेव्हा प्रवासी स्थानकापासून किमान २० मीटर दूर असेल.मध्य आणि पश्चिम रेल्वेने समाज माध्यमावरूनही प्रवाशांना या बदलाची माहिती दिली.