सिद्धिविनायक मंदिराचा होणार विस्तार

मुंबई, दि. ५ : प्रभादेवी मुंबईतील 200 वर्ष जुन्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा विस्तार होणार आहे. या विस्तार योजनेअंतर्गत, मंदिराशेजारील 708 चौरस मीटर जागेवरील ‘राम मॅन्शन’ हा तीन मजली निवासी बंगला सुमारे 100 कोटी रुपयांना विकत घेतला जाणार आहे. याशिवाय, मंदिर विश्वस्त मंडळ मंदिर परिसराजवळील ‘सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’ (CHS) विकत घेण्याबाबतही चर्चा करत आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
या दोन जागा अधिग्रहित झाल्यानंतर मंदिर प्रशासनाची भक्तांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या जागेवर शिर्डीच्या साईबाबा मंदिरासारखा दर्शनासाठी रांगेचा परिसर, प्रसादालय, स्वच्छतागृहे, आणि भक्तांसाठी चेंजिंग रूम बांधण्यात येणार आहेत.
राम मॅन्शनमध्ये एकूण 20 फ्लॅट आहेत, ज्यांचे क्षेत्रफळ प्रत्येकी 565 चौरस फूट आहे. विश्वस्त मंडळाकडून रहिवाशांना 100 कोटी रुपये दिले जात आहेत, जी बाजारातील दरापेक्षा 1.5 ते 2 पट जास्त आहे, मंदिर विश्वस्त मंडळाचे प्रमुख आणि माजी आमदार सदा सरवणकर यांनी केला. तसेच, मंदिराच्या शेजारील मैदानाखाली 450 गाड्यांसाठी भूमिगत पार्किंग लवकरच तयार केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) देखील जुलैमध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी तीन टप्प्यांची योजना जाहीर केली होती. 1801 मध्ये बांधलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असून, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीसाठी ते ओळखले जाते.