चंद्रपूरात झरपट नदीवरील जुना पूल कोसळला….
चंद्रपूर दि ४:– चंद्रपूर शहरात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सलग सरी कोसळत आहेत. परिणामी सर्वच नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शहरातील महाकाली मंदिर परिसरातून वाहणारी झरपट नदी पुराच्या तडाख्याने धोकादायक पातळीवर पोहोचली. या पुरामुळे हनुमान खिडकी भागातून भिवापूरकडे जाणारा जुना पूल पूर्णपणे कोसळला आहे. सुमारे 25 हजार लोकसंख्येसाठी हा पूल महत्त्वाचा वाहतूक मार्ग होता.
चंद्रपूरच्या जुन्या भागातून थेट बल्लारपूर वळण मार्गाकडे जाण्यासाठी हा एक मुख्य दुवा होता. काही वर्षांपासून या पुलात भेगा पडून तो खचत होता. नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. चालू वर्षीच्या पुराच्या तडाख्याने मात्र पूल पूर्णपणे ढासळला. यामुळे शाळकरी विद्यार्थी, व्यापारी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. आता हनुमान खिडकी – भवानी माता मंदिर मार्गे भिवापूर आणि बाबूपेठकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला असून प्रशासनाने दक्षता म्हणून कठडे लावून वाहतूक थांबवली आहे.
स्थानीय नागरिकांनी तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.ML/ML/MS