९४ वर्षीय आजींनी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके
पाणी देवी गोदारा या राजस्थानच्या बिकानेरमधील 94 वर्षीय आजींनी दृढनिश्चय आणि मेहनत याला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले आहे. चेन्नई येथे आयोजित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी अविश्वसनीय कामगिरी केली. त्यात त्यांनी चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 4 सुवर्णपदके जिंकली आहे. ‘गोल्डन ग्रँडमा’ (Golden Grandma) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाणी देवींनी 100 मीटर धावण्याची शर्यत, डिस्कस थ्रो, शॉटपुट आणि भालाफेक या चारही स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवले.
याच वर्षी मार्च महिन्यात, पाणी देवी गोदारा यांनी बंगळूरु येथे झालेल्या 45 व्या नॅशनल मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शॉटपुट, 100 मीटर धाव आणि डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदके जिंकली होती.
पाणी देवी आजही दररोज त्यांच्या गाई-म्हशींची काळजी घेतात. यासाठी त्यांना कठोर शारीरिक श्रम करावे लागतात. त्यांच्या या दैनंदिन कामातूनच त्यांच्या फिटनेसची दिनचर्या सुरू होते.