बेस्टला पालिकेचा आर्थिक आधार, नवीन बसेससाठी ९२८.६५ कोटींचे अनुदान

मुंबई दि.2( एम एमसी न्यूज नेटवर्क : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाला पालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक नवीन बसेस घेणे, वीज खरेदी, दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान यासाठी मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात तब्बल ९२८. ६५ कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षांत ८०० कोटी रुपये अनुदान दिले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२८.६५ कोटींची वाढ झाली आहे.
सर्वांत स्वस्त व अखंडित वीजपुरवठा व बेस्ट बसेस प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाची गाडी गेल्या काही वर्षांत तोट्यात धावत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्टला उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ८ हजार कोटींची मदत केली आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी तीन हजार कोटींची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने यंदा बेस्ट ९२८ .६५ कोटी रुपये अनुदान दिले आहे.
बेस्ट उपक्रमास पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी, कर्जाची परतफेड, भाडेतत्वावरील नवीन बसेस घेणे, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, दैनंदिन खर्च भागविणे, आयटीएमएस प्रकल्प, कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी देणे, विद्युत देणी अदा करण्यासाठी पालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून ८०० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली होती.
मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या दोन हजार इलेक्ट्रीक बस गाड्यांचे प्रवर्तन करण्याचे नियोजिले आहे. यासाठी २५७३ कोटी इतका खर्च असून त्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चात वाढ होण्याची शक्यता असून ७० टक्के म्हणजेच ८०१ कोटी इतकी रक्कम जागतिक बँकेकडून स्फाॅट लोनच्या स्वरुपात बेस्ट उपक्रमास प्राप्त होणार आहे. तर एकूण प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के हिस्सा म्हणजेच ६४३.३५ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून बेस्ट उपक्रमास देण्यात येणार असून उर्वरीत ५ टक्के हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी इतकी रक्कम बृहन्मुंबई महानगरपालिकेने देण्याबाबत राज्य शासनामार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमास अतिरिक्त अनुदान म्हणून ९२८.६५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
SW/KA/SL
2 Feb. 2024