तामिळनाडूत ९ पोलिसांना फाशीची शिक्षा
चेन्नई, दि. 7 : राज्यातील मदुराई जिल्ह्यात खाकी वर्दीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या एका कृत्याने 6 वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता. बाप आणि लेकाला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्यांना जीवे मारणाऱ्या ९ पोलिसांना अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 19 जून 2020 रोजी लॉकडाऊनच्या काळात घडली होती. जयराज आणि बेनिक्स यांचे मोबाईलचे दुकान होते. त्यांनी नियमापेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेऊन रात्रभर लाठ्यांनी आणि शस्त्रांनी बेदम मारहाण करण्यात आली. या छळामुळे दोघांचाही काही दिवसांतच मृत्यू झाला.
मदुराई न्यायालयाने काल थुथुकुडी जिल्ह्यातील व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात हा ऐतिहासिक निकाल दिला. दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये इन्स्पेक्टर श्रीधर, सब-इन्स्पेक्टर बाळकृष्णन, रघू गणेश आणि इतर 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
न्यायालयाने निकाल देताना अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले. बाप आणि मुलाला एकमेकांसमोर विवस्त्र करून ज्या निर्दयीपणे मारहाण करण्यात आली, ते वाचूनही हृदयाचा थरकाप उडतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.
सरकारी तिजोरीतून पगार घेणारे अधिकारी कामाचा ताण असल्याचे कारण देऊन असा अमानुष छळ करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने ठणकावून सांगितले. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणावर सतत देखरेख ठेवली नसती, तर सत्य कधीच समोर आले नसते, असेही कोर्टाला वाटले.
SL/ML/SL