गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू

 गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू

अहमदाबाद, दि. ९ : गुजरातमधील वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आज सकाळी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. महिसागर नदीवर असलेला हा पूल कोसळल्याने त्यावरून जात असलेली वाहने थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने मदतकार्य हाती घेतले आहे.

दुर्घटनेच्या वेळी पुलावरून दोन ट्रक, दोन चारचाकी वाहने आणि एक रिक्षा जात होती. पूल कोसळताच ही सर्व वाहने नदीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि काही जखमींना बाहेर काढण्यात यश आले. पूल सुमारे ४५ वर्षे जुना होता आणि मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा मानला जात होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल कमकुवत झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ₹२ लाखांची आणि जखमींना ₹५० हजारांची मदत जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्हा पंचायत सदस्य हर्षद सिंह परमार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, या पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत दोन वर्षांपूर्वीच सरकारला पत्र पाठवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ही दुर्घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली शोकांतिका असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या घटनास्थळी शोधमोहीम सुरू असून, आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *