जपानमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप, किनाऱ्यावर धडकल्या त्सुनामीच्या लाटा
टोकियो,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भीषण संकटाला सामोरा जात आहे. जपानमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जपानी मीडिया एनएचकेनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली. राजधानी टोकियो आणि कांटो या भागांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त द जपान टाइम्सने दिले आहे. जपानच्या सरकारच्या मालकीची वृत्तवाहिनी NHKनुसार सुनामीचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टी भागात ५ मीटर इतक्या उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना तातडीने अन्य ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी उंचीच्या ठिकाणी जावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. NHKच्या रिपोर्टनुसार इशिकावा प्रांतातील वाजिमा शहराच्या किनारपट्टीला १ मीटर पेक्षा अधिक उंचीचा लाटा धडकल्या आहेत.
त्सुनामीच्या लाटांची उंची ०.४ मीटर अर्थात १.३ फुट इतकी उंच आहे. या लाटांची उंची आणखी मोठी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने शुक्रवारी जपानच्या निगाटा प्रांतात असलेल्या जागातील सर्वात मोठ्या आण्विक ऊर्जा केंद्र काशीवाजाकी-कावीवा जवळ लाटांची उंटी १.३ फुट इतकी नोंदवली आहे. फुकुई प्रीफिक्चर सुरक्षा समितीने आण्विक केंद्राला सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. केंद्रावर आणीबाणीची परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान दक्षिण कोरिया हवामान संस्थाने दिलेल्या माहितीनुसार त्सुनामीची लाट दक्षिण कोरियाच्या गँगवॉन प्रांतातील मुखोच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचली. या लाटेची उंची ४५ सेमी इतकी नोंदवण्यात आली आहे.
भूकंपानंतर देशातील अनेक महामार्ग बंद झाले आहेत. तर हजारो घरांची वीज गेली आहे. हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी माहिती केंद्राने दिलेल्या माहितीनुसार जपानमधील मुख्य बेट होन्शूच्याबाजूने, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावरून धोकादायक त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. सरकारी वृत्तवाहिनी एनएचके टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, लाटांची उंची पाच मीटर इतकी असू शकते. किनारपट्टी भागातील लोकांनी तातडीने उंच ठिकाणी किंवा जवळच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जावे. जपानच्या पश्चिम किनारपट्टीवर निगाटा आणि अन्य ठिकाणी कमी उंचीच्या त्सुनामी लाटांची नोंद झाली आहे.
SL/KA/SL
1 Jan. 2024