राज्यात ६६१ शाळा अनधिकृत, त्यात १६० मदरसे

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ६६१ अनधिकृत शाळा असून ज्या संस्थांनी कागदपत्रे पूर्णतः सादर केली आहेत मात्र ज्यांना जागेची अडचण येत आहे त्यांना कायद्यात बदल करण्याचा विचार करून परवानगी दिली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
६६१ अनधिकृत शाळांपैकी ३७८ शाळा अद्याप सुरू असून बाकीच्यांना दंड आकारण्यात आला किंवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यात १६० मदरसे आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या अनधिकृत शाळांपैकी ३४७ शाळा एकट्या मुंबईत आहेत त्याखालोखाल नागपुरात आणि त्यानंतर पुण्यात आहेत.
१९ शाळा संस्थेनी बोगस कागदपत्रे सादर केल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नाही , मात्र ज्यांनी योग्य कागदपत्रे सादर केली आहेत आणि केवळ जागेची अडचण आहे त्यांना कायद्यात बदल करून सहानुभूतीपूर्वक विचार करून परवानगी देण्यात येईल असेही केसरकर यांनी सांगितले. शिक्षक भरती वर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती होती ती आता उठली आहे, त्यामुळे येत्या महिन्याभरात शिक्षक भरती पूर्ण केली जाईल असं ते म्हणाले.
आधारकार्ड पडताळणी आवश्यकच
शाळेतील शिक्षक संच मान्यतेसाठी विद्यार्थी आधारकार्ड पडताळणी आवश्यकच आहे, आतापर्यंत ९२ टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे , उर्वरित लवकरच पूर्ण केली जाईल मात्र त्यासाठी संच मान्यता थांबविण्यात आलेली नाही अशी माहिती अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिली.
मध्यान्न भोजनासाठी नवी योजना लवकरच आणली जाईल , विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी रुचकर असावी तसेच त्यांना अधिक पौष्टिक आहार मिळावा असा या योजनेचा आधार असेल असं केसरकर यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ML/KA/SL
21 July 2023