मुंबई पालिकेचे ६०५ विद्यार्थी झळकले शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

 मुंबई पालिकेचे ६०५ विद्यार्थी झळकले शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी ) परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ३१७ आणि इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता (मेरिट लिस्ट) यादीत स्थान मिळविले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला. भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आज हा गौरव सोहळा पार पडला.

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर अणि शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांच्या उपस्थितीत या गुणवंत्त विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्व उप शिक्षणाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील इयत्ता ५ वीच्या ३१७ आणि इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता (मेरिट लिस्ट) यादीत स्थान मिळविले. इयत्ता ५ वीच्या संचिता कांबळे (भरूचा रोड महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २) या विद्यार्थीनीने ७६.८७ गुण मिळवून बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेमधून प्रथम क्रमांक मिळविला. वेदिका सावंत (एल. के. वाघजी एम पी एस शाळा ) या विद्यार्थीनीने ७६.८७ गुणांसह द्वितीय तर शिवम वर्मा (देवनार वसाहत महानगरपालिका शाळा) या विद्यार्थ्याने ७२.१० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता ८वीच्या सनिका सिंग (दिंडोशी वसाहत महानगरपालिका हिंदी शाळा क्रमांक १) या विद्यार्थीनीने ६५.७७ गुण मिळवून बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचबरोबर रिद्धी कांबळे (विलेपार्ले पूर्व एमपीएस शाळा) हिने ६४.४२ गुणांसह द्वितीय तर रोहित पुखराम बालोटिया (सहकार नगर शताब्दी सोहळा हिंदी शाळा क्र. १) या विद्यार्थ्याने ६४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

सन २०१६-१७ पासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरुपात आमुलाग्र बदल झाले आहेत. परीक्षेचे कामकाज स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेश पत्र आणि निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असते. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकाही ओएमआर पद्धतीने तपासली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता ५ वीच्या ३१७ व इयत्ता ८ वीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे.

गुणवत्तेचा आलेख चढता
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.८ वी ) परीक्षेत सन २०२२ ते सन २०२४ या तीन वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख वाढता आहे. सन २०२२ मध्ये या परीक्षेत इयत्ता ५ वीचे २०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. तर सन २०२३ मध्ये ५३७ विद्यार्थ्यांपैकी २८९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान पक्के केले होते. तर सन २०२४ मध्ये ८२६ पैकी ३१७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.

याप्रमाणेच सन २०२२ मध्ये इयत्ता ८ वीचे १३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. सन २०२३ मध्ये ६६३ पैकी २७८ तर सन २०२४ मध्ये ५७४ पैकी २८८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप शिक्षणाधिकारी अजय वाणी यांनी केले, तर उप शिक्षणाधिकारी मुख्तार शहा यांनी आभार मानले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *