इस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात ६० लेबनॉनी नागरिक ठार
बेक्का, दि. 29(एमएमसी न्यूज नेटवर्क) :
लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, इस्रायली विमानांनी बेक्का खोऱ्यातील १२ हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. यामध्ये ठार झालेल्या ६० जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी मदत व पुर्नवसन कार्य सुरू आहे.इस्रायलच्या लष्कराने या माहितीला पुष्टी दिलेली नाही. गेल्या पाच आठवड्यांपासून लेबनॉनच्या विविध भागांत हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत असून त्यावरून या हल्ल्यांच्या भीषणतेची कल्पना येते.
काल इस्रायलच्या विमानांनी टायरे या किनाऱ्यालगतच्या शहरावर केलेल्या हवाई हल्ल्यात ७ जण ठार झाले असून १७ जण जखमी झाले आहेत. लेबनॉनवर गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत २,६०० नागरिक ठार झाले असून साडेबारा हजार जण जखमी झाल्याची माहिती लेबननच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.