ट्रेनच्या धडकेत ६ हत्तींचा मृत्यू

कोलंबो, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत वन्य हत्तींची लोकसंख्या तीन ते चार हजाराच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. आशियाई हत्तीची लुप्तप्राय प्रजाती अधिवास नष्ट होण्यामुळे आणि शिकारीमुळे धोक्यात आली आहे. त्यातच जंगले नष्ट झाल्यामुळे श्रीलंकेत हतींचा वावर आता मानवी वस्तीपर्यंत वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघात घडत आहेत . श्रीलंकेतील हबराना परिसरात असाच एक मोठा अपघात झाला आहे . एका प्रवासी ट्रेनची हत्तींच्या कळपाला धडक बसली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, या अपघातात सहा हत्तींचा मृत्यू झाला. तसेच दोन जखमी झाले. जखमी हत्तींवर उपचार सुरू आहेत. . पण रेल्वे अपघातात हत्तींचा मृत्यू होण्याची या देशातील ही पहिली वेळ नाही. याआधीही असे अपघात घडले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेमुळे हत्तींना आता मानवी क्षेत्रात प्रवेश करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे ते रेल्वे रुळांवर, शेतांवर आणि गावांवर येत आहेत आणि अपघातांचे बळी ठरत आहेत.
रेल्वे अपघातांव्यतिरिक्त, अनेक हत्ती वीज पडून, विषारी अन्न खाऊन आणि शिकारीचे बळी ठरतात. परंतु अशा अपघातामध्ये हत्ती किंवा अन्य वन्यप्राण्यांचा मृत्यू आता श्रीलंकेत सामान्य बाब मानली जात आहे. . वन्यजीव संवर्धन संघटनांच्या मते, दरवर्षी सुमारे २० हत्ती रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गेल्या वर्षी मानव विरूद्ध हत्ती यांच्यात संघर्षात १७० हून अधिक लोक आणि सुमारे ५०० हत्तींचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.
SL/ML/SL
22 Feb. 2025