छंद देई आनंद’ कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार

 छंद देई आनंद’ कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास काल प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे कवी आणि बाल
साहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी स्वीकारला.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 चा प्रदान सोहळा समारंभ त्रिवेणी कला संगम, मंडी हाऊस, नवी दिल्ली येथे गुरुवारी सांयकाळी झाला. यावेळी प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि अभ्यासक हरीश त्रिवेदी, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते सन्माननीय साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी 23 प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती.

पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे आहे. मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रो (डॉ.) विलास पाटील यांचा समावेश होता.

‘छंद देई आनंद’ या काव्यसंग्रहाविषयी

‘छंद देई आनंद’ मराठी बालकविता संग्रहात, इतिहास, विज्ञान, पर्यावरण आणि संस्कृतीबद्दलची माहिती सोप्या भाषेत मांडली गेली आहे. हा संग्रह वाचकांना समाज, वनस्पती आणि प्राण्यांबद्दल शिक्षित तसेच जागरूक करतो, मुलांचे मनोरंजन करतो आणि त्यांना जीवनातील विविध उपयुक्त गोष्टींचे महत्त्व समजण्यास, चांगल्या सवयी विकसित करण्यास मदत करतो. कवितांची लय मंत्रमुग्ध करणारी आहे आणि हे कार्य पालक, शिक्षक आणि निसर्गाबद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर आकर्षित करते.

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या विषयी

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कथाकथनकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ३० वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली ३० वर्षे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात.

साने गुरुजींची कथाकथन परंपरा पुढे नेण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतात. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक साने गुरुजी पुरस्काराचे मानकरी आहेत. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची फुले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद, पाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकवितासंग्रह, आनंदाची बाग, एकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा, प्रकाशाचा उत्सव हे बालकथासंग्रह, मजेदार कोडी, आलं का ध्यानात?, खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रह, मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह, मिसाईल मॅन हे चरित्र… आदी त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत.

त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लिपीमध्ये देखील अनुवाद झालेले आहेत. त्यांची जवळपास ३० पुस्तके प्रसिद्ध असून, त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव पुरस्कार, बालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

ML/KA/PGB 10 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *