१४ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या प्रकरणातून ५९ जणांची निर्दोश सुटका
अकोला, दि. १९ : शहरात चौदा वर्षांपूर्वी झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने आता एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे. 2011 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यात मोठी खळबळ माजली होती, मात्र आता पुराव्यांच्या अभावामुळे या प्रकरणातील सर्व 59 आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 14 वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.
कारंजा येथील एका तरुणाने फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती, ज्याचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ 28 नोव्हेंबर 2011 रोजी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी अकोला शहर बंदचे आवाहन केले होते.
या बंद दरम्यान शहरातील तिलक रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. जमावाने घोषणाबाजी करणे, दुकाने सक्तीने बंद पाडणे, लूटपाट, मारहाण आणि वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता.
दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात ज्येष्ठ फौजदारी वकील ॲड. नजीब शेख यांनी 45 आरोपींच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांच्या साक्षीमध्ये असलेले अंतर आणि पुराव्यांची कमतरता याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. अखेर न्यायालयाने सर्व बाबी तपासून सर्व 59 आरोपींना निर्दोष मुक्त केले. 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा निकाल लागल्याने आरोपींच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.