सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५८ हजार टन ऊस उत्पादन

सावंतवाडी, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग हा व्यावसायिक ऊस लागवड होणारा कोकणातील एकमेव जिल्हा आहे. वैभववाडी आणि कणकवली या दोन जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गातील अधिक प्रमाणात ऊस उत्पादन होते. यावर्षीच्या जिल्ह्यातील तोडणी हंगाम आता पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी पूर्ण झाली असून सिंधुदुर्गातून ५८ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार टन उत्पादन वाढले आहे. मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी वेळेत ऊसतोडणीमुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
या वर्षीचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. कारखाना प्रशासनाने जिल्हयातील ऊसतोडणीकडे सुरुवातीपासून लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे पहिल्या महिना-दीड महिन्यातच ४० टक्के ऊसतोडणी पूर्ण झाली होती. त्यानंतर देखील ऊस तोडणीची गती कायम ठेवल्यामुळे जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी वेळेत पूर्ण झाली. जिल्ह्यातून यावर्षी ५८ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. गेल्यावर्षी ४८ हजार टन ऊस उत्पादित झाला होता.
जिल्ह्यातील ९० टक्के ऊस हा असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यावर गाळप होतो. या कारखान्यामुळे कोकणात ऊसलागवड सुरू झाली. या कारखान्याचे सिंधुदुर्गातील वैभववाडी आणि कणकवली हे दोन तालुके कार्यक्षेत्र असले तरी उर्वरित जिल्ह्यातील ऊसदेखील कारखाना गाळपाकरिता घेतो. दरम्यान विविध अडचणींंमुळे सिंधुदुर्गातील उसाचे क्षेत्र १७०० हेक्टरवरून आता ११६० हेक्टरपर्यंत घटले आहे.
SL/ML/SL
3 April 2024