देशभरात सुरु होणार ५७ नवी केंद्रीय विद्यालये

नवी दिल्ली, दि. ३ : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने देशभरात ५७ नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये ७ शाळा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असतील, तर उर्वरित ५० शाळांचे संचालन संबंधित राज्य सरकारांकडे सोपवले जाईल.
या शाळांपैकी २० शाळा अशा जिल्ह्यांमध्ये उभारल्या जातील जिथे अद्याप केंद्रीय विद्यालय अस्तित्वात नाही, पण केंद्र सरकारचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. एकूण प्रकल्पासाठी पुढील नऊ वर्षांत सुमारे ₹५,८६२ कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये ₹२,५८५.५२ कोटी भांडवली खर्च आणि ₹३,२७७.०३ कोटी शाळा व्यवस्थापनासाठी खर्च केला जाणार आहे.
योजनेअंतर्गत १४ शाळा आकांक्षी जिल्ह्यांमध्ये, ४ नक्षलग्रस्त भागात आणि ५ शाळा ईशान्य व पर्वतीय राज्यांमध्ये उभारल्या जातील. सरकारने अद्याप प्रत्येक शाळेचे ठिकाण स्पष्ट केलेले नाही.
केंद्रीय विद्यालयांची संकल्पना १९६२-६३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती, ज्याचा उद्देश केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना एकसमान दर्जाचे शिक्षण देणे हा होता. सध्या देशात आणि परदेशात मिळून एकूण १,२८८ केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत, ज्यामध्ये मॉस्को, काठमांडू आणि तेहरानमधील तीन शाळांचा समावेश आहे. ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे १३.६२ लाख विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
नवीन शाळांमुळे अंदाजे ८६,६४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. प्रत्येक शाळेत सुमारे १,५२० विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि ८१ शिक्षक व कर्मचारी असतील. त्यामुळे सुमारे ४,६१७ नवीन नोकऱ्या निर्माण होतील, तसेच बांधकाम व इतर संबंधित कामांमुळे अनेक कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
SL/ML/SL
3 Oct. 2025