मुंबईतून 550 किलो बनावट पनीर जप्त

मुंबईमध्ये पनीरऐवजी ‘चीझ अॅनालॉग’ या पनीरसदृश हलक्या पदार्थाची विक्री सुरू असल्याचं उघड झालं आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईतून ही गंभीर बाब समोर आली. अॅन्टॉप हिल परिसरात दोन डेअरींवर छापा टाकून तब्बल 550 किलो चीझ अॅनालॉग जप्त करण्यात आले असून खोट्या पनीरच्या माध्यमातून मुंबईकरांची फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. अॅन्टॉप हिलमधील जीटीबी नगर परिसरात ज्या दोन डेअरींवर कारवाई करण्यात आली त्यांची नाव, ‘ओम कोल्ड्रींक हाऊस’ व ‘श्री गणेश डेअरी’ अशी आहेत. या दोन्ही डेअरींचे मालक पनीरच्या नावाखाली ‘चीझ अॅनालॉग’ची विक्री करत होते. सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक रोहन बगाडे, महेश सांगळे, पोलिस उपनिरिक्षक नंदकिशोर बोरोले यांच्या पथकाने छापा टाकून दोन्ही डेअरीतून भेसळयुक्त पनीर जप्त केले.
हॉटेल, केटरिंग व्यवसायिक असे भेसळयुक्त पदार्थ स्वस्त दरात विकत घेतात. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ साठवणे किंवा विकणे टाळा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.