चारधाम यात्रेत आतापर्यंत ५२ भाविकांचा मृत्यू

डेहराडून, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी १० मे पासून सुरु झालेल्या चारधाम यात्रेत आतापर्यंत ५२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात बद्रीनाथमध्ये १४, केदारनाथमध्ये २३, गंगोत्रीमध्ये ३ आणि यमुनोत्रीमध्ये १२ भाविकांनी आपले प्राण गमावले आहेत. या भाविकांचा मृत्यू छातीत दुखणे, अस्वस्थता किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. प्रशासनाकडून यात्रा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र यावर्षी नेहमींपेक्षा खूप अधिक प्रमाणात भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठराविक यात्रेकरूंनाच टप्प्याटप्प्याने तीर्थस्थळी दर्शनासाठी सोडले जात आहे. यामुळे आपला नंबर लागेपर्यंत दिवसेंदिवस यात्रेकरूंना रांगेत प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने या कंटाळवाण्या प्रतिक्षा रांगेमध्ये त्यांच्या प्रकृतीवर ताण येत आहे.
गुरुवारी बद्रीनाथ धाम यात्रेला आलेल्या केरळमधील एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी विष्णुप्रयागमध्येच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. बद्रीनाथ धामच्या यात्रेला आलेल्या आतापर्यंत ८ भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गेल्या १० वर्षांत केदारनाथमध्ये ३५० भाविकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान गढवालच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार , 10 मे 2024 रोजी श्री केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे आणि 12 मे रोजी श्री बद्रीनाथचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले होते. तेव्हापासून 23 मे 2024 पर्यंत एकूण 09 लाख 67 हजार 302 भाविकांनी चार धामांचे दर्शन घेतले आहे.
यमुनोत्री धाममध्ये 01 लाख 79 हजार 932 भाविकांनी, गंगोत्री धाममध्ये 01 लाख 66 हजार 191, श्री केदारनाथमध्ये 04 लाख 24 हजार 242 आणि बद्रीनाथ धाममध्ये 01 लाख 96 हजार 937 भाविकांनी दर्शन घेतले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात जवळपास दुप्पट भाविकांनी दर्शन घेतले आहे. चारधाम यात्रेतील गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक असेल तेव्हाच एनडीआरएफ आणि आयटीबीपीची मदत घेतली जाईल, असे गढवाल आयुक्तांनी सांगितले.
SL/ML/SL
25 May 2024