भारतावर उद्यापासून लागू होणार 50% अमेरिकन टॅरिफ

वॉशिग्टन डीसी, दि. २६ : अमेरिकन सरकारने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५% कर लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. दंड म्हणून लावण्यात आलेला हा कर भारतीय वेळेनुसार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३१ वाजल्यापासून लागू होईल.
रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी हा कर जाहीर केला. यापूर्वी व्यापार तूट लक्षात घेऊन ७ ऑगस्टपासून भारतावर २५% कर लादण्यात आला होता. याचा अर्थ असा की भारतीय वस्तूंवरील एकूण कर आता ५०% पर्यंत असेल.
त्यात म्हटले आहे की, ‘या दस्तऐवजाच्या यादीत नमूद केलेले शुल्क भारतातून येणाऱ्या वस्तूंवर लागू होईल. या वस्तू वापरासाठी अमेरिकेत आणल्या जातील किंवा वापरासाठी गोदामातून बाहेर काढल्या जातील. हा नियम २७ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२:०१ वाजता EST पासून लागू होईल.’
रशियाबरोबरच्या व्यापारामुळे अमेरिकेची भारतावर नाराजी
चीननंतर भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत असे. मे २०२३ पर्यंत, हे प्रमाण ४५% (प्रतिदिन २ दशलक्ष बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये, जानेवारी ते जुलै या कालावधीत, भारत रशियाकडून दररोज १७.८ दशलक्ष बॅरल तेल खरेदी करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.
टॅरिफ बाबत ट्र्म्पची भूमिका
टॅरिफ म्हणजे आयात शुल्क. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा तो त्यावर काही कर लादतो, ज्याला टॅरिफ म्हणतात. ट्रम्प म्हणतात की भारत अमेरिकन वस्तूंवर खूप जास्त टॅरिफ आकारतो, तर अमेरिका भारतीय वस्तूंवर कमी कर आकारतो.
ट्रम्प यांना वाटते की हा अन्याय आहे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या ‘परस्पर टॅरिफ’ धोरणाअंतर्गत भारतावर २५% टॅरिफ लादण्याची घोषणा केली. ट्रम्प म्हणतात की भारत त्यांच्या वस्तूंवर जास्त कर लादत आहे, आता ते भारतीय वस्तूंवरही जास्त टॅरिफ लादतील. रशियाकडून भारताने तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दलही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली.