पंतप्रधान जनमन योजनेतून महाराष्ट्राला ५० कोटींचा निधी मंजूर

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत अर्थात पीएम जनमन योजनेतून राज्यातील पायाभूत विकास कामांना गती देण्याचा निर्णय आज (ता.३०) घेतला आहे. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील ५०.३५ कोटी रूपयांच्या २७ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. या निधीच्या माध्यमातुन ५०.१३ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्रालयाने दिली आहे.पीएम जनमन योजनेच्या दळणवळण या घटकातून विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या वस्त्यांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध करू दिले जाते. यासाठी महाराष्ट्रातील २७ विशेष दुर्बल आदिवासी गटाच्या रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी २३ ऑगस्ट २०२४ रोजी १९४ जिल्ह्यातील विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या रस्त्यांसाठी मान्यता दिली होती. देशात अनुसूचित जमातीची संख्या १०.४५ कोटी आहे. या योजनेतुन अनुसूचित जमातींचा समाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास घडवून आणण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी केंद्र सरकारने योजना राबवली आहे.
SL/ML/SL
30 Jan. 2025