१ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 विशेष वाहिन्या सुरु

मुंबई, दि. १७ :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘पीएम-ई-विद्या’ उपक्रमाअंतर्गत 200 शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी 5 खास वाहिन्या महाराष्ट्रातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांना घरबसल्या अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार शिक्षण मिळेल.
SCERT महाराष्ट्राचे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षक, अधिकारी आणि पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या ‘पीएम-ई-विद्या’ वाहिन्या YouTube वर सबस्क्राइब कराव्यात. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणातील दरी कमी होण्यास मदत होईल आणि शिक्षकांनाही अध्यापनासाठी एक नवे प्रभावी साधन मिळेल.
या वाहिन्यांचे वेळापत्रक पाहण्यासाठी आणि लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी, परिषदेच्या www.maa.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘पीएम-ई-विद्या वाहिन्या’ या टॅबला भेट द्यावी किंवा थेट http://www.maa.ac.in/index.php?tcf=pmev या लिंकवर क्लिक करावे.
या सर्व वाहिन्या DD-Free Dish वर आणि YouTube वर लाईव्ह पाहता येतील. प्रत्येक वाहिनीवर दररोज 6 तासांचे नवे शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातील आणि हे कार्यक्रम दिवसभरात 3 वेळा पुन्हा प्रसारित केले जातील. यामुळे विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी अभ्यास करू शकतील.
या उपक्रमासाठी राज्यस्तरावर आणि प्रत्येक वाहिनीसाठी तज्ज्ञांची एक समन्वय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कार्यक्रमांची गुणवत्ता, वेळापत्रक आणि ते जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचतील याची खात्री करेल.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक इयत्तेनुसार वेगवेगळ्या वाहिन्यांची विभागणी करण्यात आली आहे. या वाहिन्यांची नावे आणि त्यांच्यावर शिकवले जाणारे वर्ग खालीलप्रमाणे आहेत:
SCERTM C 113: इयत्ता 1 ली आणि 6 वीSCERTM C 114: इयत्ता 2 री आणि 7 वीSCERTM C 115: इयत्ता 3 री आणि 8 वीSCERTM C 116: इयत्ता 4 थी आणि 9 वीSCERTM C 117: इयत्ता 5 वी आणि 10 वी