मुंबई शहरात 30 मे पासून 5 टक्के तर 5 जून पासून 10 टक्के पाणी कपात
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात गुरूवार 30 मे पासून 5 टक्के पाणीकपात, तर बुधवार 5 जून पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सन 2021 आणि 2022 या दोन वर्षात दिनांक 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र सन 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे 5.64 टक्के पाणीसाठा कमी आहे.
आज, 25 मे रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण 1 लाख 40 हजार 202 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त 9.69 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर पालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.
एवढेच नव्हे तर, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे, यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, ही देखील सकारात्मक बाब आहे.
असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने प्रशासनाने सदर पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही 5 टक्के आणि 10 टक्के कपात अनुक्रमे नियत दिनांकापासून लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
SW/ML/SL
25 May 2024