कांदळवन विभागाने संरक्षित केली ऑलिव्ह रिडले कासवांची ४८,७०१ अंडी

रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्याच्या अखेरीस ऑलिव्ह रिडले या महाकाय समुद्र कासवाची वीण होते. यासाठी हजारोंच्या संख्येने कासवे या समुद्र किनारी येतात. काही वर्षांपूर्वी या कासवांच्या अंड्यांची खाण्यासाठी चोरी होत असे. यातून वाचलेल्या आणि अंड्यातून बाहेर पडून समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या लहान पिल्लांना शिकारीचा धोका होता. त्यामुळे कांदळवन विभागाने कासव मित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हापर्यत रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर तब्बल ४८ हजार ७०१ इतक्या मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी कांदळवन विभागाने संरक्षित केली आहेत.
वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर रत्नागिरी ते मंडणगड वेळास दरम्यान उभारलेल्या ४४८ घरट्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ४८ हजार ७०१ इतकी अंडी संरक्षित करण्यात कांदळवन विभागाला यश आले आहे.
ऑलिव्ह रिडले सागरी कासव हे निसर्ग संतुलनात महत्वाची कामगिरी पार पाडत असतात अशा या निसर्ग संतुलनाची महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवरील दापोली तालुक्यात आडे येथील समुद्र किनारपट्टीवर उभारण्यात आलेल्या २ घरटयांमध्ये २०७ अंडी, मुरुड १ घरटे १३५ अंडी, लाडघर ३ घरटी २९६ अंडी, दाभोळ ६५ घरटी ६ हजार २८१ अंडी, आंजर्ले ११ घरटी १ हजार ३११ अंडी, कर्दे ७ घरटी ७७२ अंडी, कोळथरे ३० घरटी २ हजार ९६४ अंडी आणि केळशी येथे १७ घरटी असून १ हजार ७३६ अंडी संरक्षित केली आहेत.
अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी ते मंडणगड वेळास पर्यंतच्या समुद्र किनारपट्टीवर ४४८ घरटयांमध्ये एकुण ४८ हजार ७०१ ऑलिव्ह रिडले टर्टल महाकाय कासवांची अंडी संरक्षित करण्यास वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या या महत्वपूर्ण कामगीरीचे प्राणी मित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
SL/ML/SL
16 Feb. 2025