४८ तासांत ७ हजार ३८९ बॅनर्स, फलक


निष्कासित
मुंबई दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क):
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निष्कासन कार्यवाही सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण ७ हजार ३८९  भित्तीपत्रके,  फलक, बॅनर्स, झेंडे आदी साहित्य  निष्कासित केले आहेत. 

	बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा) विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नयेत. ज्याठिकाणी अनुज्ञेय आहे, त्याठिकाणी विहित परवानगी प्राप्त करून त्यानंतरच जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे. 

	 तसेच, नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स इत्यादी प्रचार साहित्यावर निष्कासन कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. 

	आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भित्तीपत्रके (९४२), फलक (८१७), कटआऊट होर्डिंग (५९६), बॅनर्स (३७०३), झेंडे (१३३१) आदी मिळून एकत्रितपणे ७ हजार ३८९ साहित्य अनुज्ञापन खात्याने निष्कासित केले आहे. अनुज्ञापन खात्याच्या  चमुमार्फत महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये सातत्याने अशा पद्धतीचे साहित्य निष्कासन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना उपायुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव यांनी दिल्या आहेत.  

	Cvigil App  या एपच्या मदतीनेही मतदारांना आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करण्याची सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.  या एपवर केलेल्या तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांत केले जाते. त्याशिवाय मतदारांना १९५० या हेल्पलाईन क्रमांकाचाही पर्याय पुरविण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *