Zomato ला ४०१ कोटी रुपयांची GST नोटीस
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोला ४०१.७ कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा कराची (GST) नोटीस मिळाली आहे.झोमॅटोने मात्र हा कर देण्यास नकार दिला आहे. कंपनीला ही नोटीस ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत डिलिव्हरी चार्ज कलेक्शनवरील थकबाकी करासाठी देण्यात आली आहे. झोमॅटोला २६ डिसेंबर रोजी जीएसटी इंटेलिजेंस महासंचालक, (डीजीजीआय-DGGI) पुणे विभागीय युनिटकडून केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 74(1) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली आहे.
नोटीसमध्ये कंपनीकडून 401 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या जीएसटी दायित्वासह व्याज आणि दंडाची मागणी का करण्यात येऊ नये, याचे उत्तर मागविण्यात आले आहे. झोमॅटोने ग्राहकांकडून अन्न वितरण शुल्क म्हणून घेतलेल्या रकमेवर कराची मागणी केली जात आहे.
कर भरण्याचे नाकारल्याबद्दल झोमॅटोने म्हटले की, डिलिव्हरी शुल्कावर कोणत्याही प्रकारचा कर भरण्याची जबाबदारी नाही. कारण कंपनी रेस्टॉरंट पार्टनरसाठी डिलिव्हरी चार्जेस वसूल करते. कराराच्या अटी व शर्तींनुसार, वितरण भागीदार ही सेवा कंपनीला नाही तर ग्राहकांना प्रदान करतात. नोटीसला उत्तर देण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे झोमॅटोने सांगितले आहे.
यापूर्वी नोव्हेंबरमध्येदेखील, झोमॅटो आणि स्विगी या खाद्यपदार्थ वितरण प्लॅटफॉर्मला जीएसटी इंटेलिजेंस महासंचालकांकडून 750 कोटी रुपयांची प्री-डिमांड नोटीस मिळाली होती. फूड डिलिव्हरी कंपन्या आणि जीएसटी विभाग यांच्यातील कर दायित्वाबाबत उपस्थित केलेले हे सर्व प्रश्न डिलिव्हरी चार्जेसबाबत आहेत. अन्न वितरण ही सेवा असल्याचे डीजीजीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे झोमॅटो आणि स्विगी 18 टक्के दराने सेवांवर जीएसटी भरण्यास जबाबदार आहेत.
SL/KA/SL
28 Dec. 2023