विमानाची धडक बसल्याने ३६ फ्लेमिंगो मृत्युमुखी
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि नवी मुंबई किनाऱ्यालगतची पाणथळ जागा हे फ्लेमिंगोंचे प्रसिद्ध अधिवास आहेत. हे स्थलांतरित पक्षी डिसेंबरच्या आसपास या किनाऱ्यांवर येतात आणि मार्च आणि एप्रिलपर्यंत दिसतात. गेल्या काही काळात फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात आला आहे. यापूर्वीही नवी मुंबईत साईन बोर्डवर आदळून काही पक्षी मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं होतं. तर नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत ३६ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला आहे,
फ्लेमिंगोच्या थव्याला विमानाची धडक बसल्यामुळे तब्बल ३६ पक्ष्यांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईतील घाटकोपर भागातील लक्ष्मी नगर परिसरात एमिरेट्स कंपनीच्या विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली. एकीकडे ३६ पक्षी गतप्राण झाले, तर दुसरीकडे विमानाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. यामध्ये विमानातील सर्व प्रवाशी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती आहे.
मुंबई विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९.१८ वाजता एमिरेट्सच्या ईके ५०८ या विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली. त्यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.सोमवारी रात्री उशिरा शोध सुरू असताना, सुमारे २९ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले तर मंगळवारी सकाळी आणखी चार ते पाच मृतदेह सापडले. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत विमान कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
SL/ML/SL
21 May 2024