मंत्रालयात प्रवेशासाठीची ३,५०० डीजी कार्ड अभ्यागतांकडून लंपास

मुंबई, दि. ११ : अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश करणे सोयीस्कर व्हावे याकरिता डीजी प्रवेश ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी झालेल्यांना डीजी ॲप प्रवेश कार्ड (आरएफआयडी) देण्यात येते. यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने तब्बल ८ हजार कार्ड बनवले. अभ्यागतांना दिलेले कार्ड बॉक्स मध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र ८ हजार कार्ड पैकी ३,५०० कार्ड अभ्यागतांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डीजी प्रवेश ॲप कार्ड जमा करा, अन्यथा यापुढे मंत्रालयात कायमस्वरूपी प्रवेश बंदी असेल, असा इशारा राज्य सरकारच्या गृह विभागाने दिला आहे.
ज्या अभ्यागतांना कार्ड देण्यात आले आहे, ते कार्ड मंत्रालय सोडताना बॉक्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र कार्ड जमा न करताच अभ्यागत मंत्रालयाबाहेर पडताच त्यांना कार्ड जमा करा, असा मेसेज मोबाइलवर येतो. तरीही साडेतीन हजार आभ्यागतांनी कार्ड जमा केले नाही. सूचना करूनही दुर्लक्ष केले तर त्या अभ्यागतांना पुन्हा मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे अभ्यागतांनी कार्ड जमा करावे, असे आवाहन केल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी केले आहे.
फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्यांच्या वेळेत बचत होत असून रांगेत ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी केलेल्या अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश करताना कार्ड देण्यात येते. मंत्रालयातील आपले काम संपल्यावर कार्ड मंत्रालयातील गेटवर ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे.