३४ सहकारी आणि २७ खासगी साखर कारखान्यांनी केले एफआरपीचे वाटप
कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर विभागातील ३४ सहकारी आणि २७ खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला असून या कारखान्यांनी १५ डिसेंबर २०२२ अखेर गाळप केलेल्या ऊसाची केंद्र सरकारनं निर्धारित केलेल्या एफआरपीप्रमाणं शेतकऱ्यांना सगळे २२३२ कोटी ७१ लाख रुपये अदा केले आहेत.
पाच कारखान्यांकडे १४३ कोटी ४७ लाखांचे येणे बाकी आहे. यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसानं हंगामात झोडपून काढल्यानं विभागातील सर्वच कारखान्यांची
सुरुवात दबकतच झाली. एक रकमी एफआरपी पहिली उचलीची घोषणा केल्यानं ऊस दराचं आंदोलनही फार ताणलं गेलं नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्याआठवड्यापासून हंगामानं गती पकडली.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गाळप हंगाम जोरात झाला असून १५ डिसेंबरपर्यंत कोल्हापूर विभागात ८५ लाख २७ हजार टनांचं गाळप कारखान्यांनी केलं आहे. गाळप झालेल्या उसासाठी एफआरपीप्रमाणे २२३२ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप १४३ कोटी ४७ लाख १७ हजार रुपये
एफआरपीमधील येणे बाकी आहे.
शंभर टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांमध्ये आजरा, राजाराम, शाहू, दत्त-शिरोळ, बिद्री, जवाहर, कुंभी, शरद, वारणा, अथणी-बांबवडे, डी. वाय. पाटील, दालमिया, गुरुदत्त, इको केन-चंदगड, अथणी-तांभाळे, अथर्व-दौलत, राजाराम बापू, राजाराम बापू (वाटेगाव युनिट), राजाराम बापू (कारंदवाडी युनिट), पतंगराव कदम, दत्त इंडिया, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया भारत, सद्गुरूश्री (आटपाडी). यांचा समावेश आहे.
उदगिरी-खानापूर, हुतात्मा-वाळवा, संताजी घोरपडे ओलम, राजगोळी, पंचगंगा-इचलकरंजी मंडलीक-हमीदवाडा, भोगावती-परिते, या साखर कारखान्यांकडे अनुक्रमे१ कोटी ९३ लाख, २४ कोटी ३ लाख, २७ कोटी ४५ लाख ,२५ कोटी ५५ लाख, २१ कोटी २८ लाख, ३५ कोटी ५ लाख, ४२ कोटी ९१ लाख. इतकी एफ आर पी ची देय रक्कम राहिली आहे.
शेतकऱ्याना उसाच्या वजनाला फटका यंदा उसाला अपेक्षित वजन मिळत नाही.एकरी पाच ते सात टनानं ऊसाचं उत्पादन कमी मिळत आहे. सततच्या पावसाचा परिणाम ऊसाच्या वाढीसह वजनावर झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा १२ टक्के राहिला आहे. त्यातही कोल्हापूर जिल्ह्याचा उतारा
सरासरी १२.५० टक्के असून सांगलीचा ११.९० टक्के आहे. इथून पुढे उताऱ्यात वाढ होणार आहे.
ML/KA/SL
15 Jan. 2023