दुष्काळावर मात करत येवल्यातून 32 कोटींची द्राक्ष निर्यात

 दुष्काळावर मात करत येवल्यातून 32 कोटींची द्राक्ष निर्यात

येवला, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप आणि रब्बी हंगामात लहरी निसर्गाचा फटका नाशिक जिल्ह्यातील येवला येथील शेतकऱ्यांना बसला आहे.सध्या ७५ हून गावे-वाड्या टँकरवर तहान भागवत आहेत. अशी भयावह दुष्काळी परिस्थिती असलेल्या येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात निर्यातक्षम द्राक्ष पिकविली आहेत. प्रतिकूल वातावरणात कृषी विभागाच्या सल्ल्याने साडेचार हजार टन पिकवलेले द्राक्ष नेदरलँड, जर्मनी, युके, डेनमार्क, रशिया आदी देशांमध्ये पोचली आहेत. यामुळे तब्बल ३२ कोटी ६२ लाख रुपयांचे चलन या द्राक्ष निर्यातीत शेतकऱ्यांना मिळाले आहे.

द्राक्ष हंगामाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ऐन निर्यात हंगाम सुरु झाल्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे राज्यातील द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर मार्ग काढत दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून निर्यात सुरु झाली. तरीही यंदा राज्यातून ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत १ लाख ४९ हजार ७२१ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे.

यावर्षीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने रशिया, चीन, यूएई, मलेशिया, बांगलादेश देशांमध्ये एकूण ३५ हजार ७२२ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. तर नेदरलँड, जर्मनी, बेल्झियम, डेन्मार्क या युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ९९९ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. तालुक्यात तर सुरवातीपासून अत्यल्प पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसला असला तरी कधी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी तर शेततळ्यातील पाण्यावर शेतकऱ्यांनी बागा फुलवल्या आहे.

यंदा दुष्काळ, बेमोसमी पाऊस अन लहरी हवामानामुळे द्राक्ष बागा निघणार की नाही याची शाश्वती नव्हती पण या संकटावर मात करून द्राक्ष निर्यात करून येथील शेतकऱ्यांनी आपली जिद्द सोडलेली नाही हे विशेष. यावर्षी येवल्यामध्ये द्राक्ष निर्यातीसाठी ६८१ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टर क्षेत्र नोंदवले होते.

यातील तब्बल ४२५ शेतकऱ्यांनी २३० हेक्टर वरील द्राक्ष निर्यात केली आहेत. यावर्षी थॉमसन, क्रीमसन, सोनाकाला आदी वाणाचे द्राक्ष युरोप, नेदरलँड, डेन्मार्क, स्वीडन व अरब देशात पोचली आहे. विशेष म्हणजे द्राक्षाला सरासरी ७१ रुपयाचा प्रती किलोला चांगला भाव मिळाला आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटोदा,पिंपरी, सोमठाणे,मुखेड,मानोरी आदी परिसरातच सर्वाधिक द्राक्ष बागा आहेत. या भागातील ४२५ शेतकऱ्यांनी यंदा द्राक्ष परदेशात पाठवली. २३० हेक्टरवरील तब्बल ४ हजार ५९५ टन द्राक्ष निर्यात झाली असून द्राक्षला ६० ते १२० रुपयांपर्यंतचा दर मिळाला तर सरासरी ७१ रुपये प्रती किलोला दर मिळाल्याने तब्बल ३२ कोटी ६२ लाख रुपयांचे चलन या द्राक्ष निर्यातीत शेतकऱ्यांच्या खिशात पडले आहे. विशेष म्हणजे मागील आठ वर्षात सर्वाधिक द्राक्ष निर्यात यावर्षी दुष्काळ असूनही झाली आहे.

SL/ML/SL

22 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *