पालिकेच्या ३०० अभियंत्यांना मिळणार तंत्रशुद्ध प्रशिक्षण

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेने सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. रस्ते कॉक्रिटीकरणाची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
पालिकेने शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचे धोरण आखले आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियंता वर्ग अविरत कार्यरत आहेत. कॉंक्रिट रस्ते बांधणी कामे अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, तांत्रिक ज्ञानाबरोबरच रस्ते बांधणीसाठी काय करावे आणि काय करू नये , दैनंदिन कार्यप्रणालीत सुधारणा या विविध पैलुंची माहिती अभियंत्यांना व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
मार्गदर्शन, प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत असणा-या अभियंत्यांच्या विविध शंका – प्रश्न आदींचे देखील निरसन ‘आयआयटी – मुंबई’तील तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी या कार्यशाळेत करणार आहेत. शनिवार, दिनांक २७ एप्रिल २०२४ च्या कार्यशाळेत १५० स्थापत्य अभियंत्यांना तर शनिवार, ४ मे रोजीच्या कार्यशाळेत आणखी १५० स्थापत्य अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांचा दर्जा अत्युच्च, सर्वोत्तम व्हावा यासाठी या कार्यशाळेची मोठी मदत होणार आहे. 300 engineers of the municipality will get technical training
ML/ML/PGB
25 Apr 2024