३ वर्षीय भारतीय चिमुकल्याचा बुद्धीबळात विश्वविक्रम

कोलकाता, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्या वयात मुलं नुकतच बोलू-चालू लागतात, अशा अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी कोलकाता येथील एका चिमुरड्याने बुद्धीळात चक्क विश्वविक्रम केला आहे. तीन वर्षांच्या अनिश सरकारने फिडे (FIDE)-रेटेड बुद्धिबळपटू बनून जागतिक विक्रम केला आहे. त्याने तीन 3 वर्षे, 8 महिने आणि 19 दिवसांच्या वयात फिडे रेटिंग मिळवलं आहे.
जगातील सर्वात लहान वयाचा फिडे-रेटेड बुद्धिबळपटू बनून अनिश सरकारने तेजस तिवारीला मागे टाकलं आहे. तेजसने यापूर्वी वयाच्या पाचव्या वर्षी सर्वात तरुण फिडे-रेटेड खेळाडूचा किताब पटकावला होता.
अनिश 26 जानेवारी 2021 रोजी जन्मलेला आहे. त्याने ऑक्टोबर 2024 मध्ये पश्चिम बंगाल स्टेट अंडर-9 ओपन आणि पश्चिम बंगाल स्टेट अंडर-13 ओपनमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धांमधील प्रभावी कामगिरीमुळे त्याला फिडेचं 1555 रेटिंग मिळालं. 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या नोव्हेंबर लिस्टमध्ये अनिशचा समावेश झाला.
अनिश सध्या धानुका धुनसेरी दिव्येंदू बरुआ बुद्धिबळ अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. ही अकादमी प्रतिभावान बुद्धिबळपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेली संसाधनं पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे. फिडे रेटिंग मिळवण्यासाठी बुद्धबळपटूने 26 महिन्यांच्या आत रेटेड प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध किमान पाच गेममध्ये भाग घेणे आणि किमान अर्धा गुण मिळवणे गरजेचं असतं. ऑक्टोबर 2024 मध्ये पश्चिम बंगाल स्टेट अंडर-9 ओपन आणि पश्चिम बंगाल स्टेट अंडर-13 ओपन स्पर्धांमध्ये अनिश सरकारने हा निकष पूर्ण केला.
SL/ML/SL
4 Nov. 2024