एका शेअरवर ३ शेअर मोफत, ‘या’ कंपनीची घोषणा
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बजाज स्टील इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांंना मोठी खूषखबर दिली. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्सची घोषणा केली. त्यानुसार, कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर ३ शेअर मोफत देणार आहे. ही कंपनी स्क्रू कन्व्हेयर, लिफ्ट, कन्व्हेयिंग सिस्टम, मशीन पार्ट्स, इमारती यासह कॉटन जिनिंग उद्योगासाठी अनेक उत्पादनं आणि सेवा पुरवते. नागपूरमध्ये झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३:१ या प्रमाणात बोनस देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीकडून १.५६ अब्ज शेअर्स जारी केले जातील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या २.०८ अब्जांवर जाणार आहे. त्यांचं एकूण मूल्य १०,४०,००,००० रुपये असेल.
जून तिमाहीअखेर बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांचा कंपनीत ४८.२७ टक्के हिस्सा होता. बजाज स्टील इंडस्ट्रीजमध्ये कोणत्याही म्युच्युअल फंडाचा हिस्सा नाही. कंपनीचं मार्केट कॅप १.७३ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळानं डॉ. महेंद्रकुमार शर्मा यांची १२ नोव्हेंबर २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यास मान्यता दिली. लव बजाज यांची ३ ऑक्टोबर २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली. गौरव सारडा यांची ३ ऑक्टोबर २०२४ पासून पुढील दोन वर्षांसाठी कंपनीचे अतिरिक्त बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे.
ML/ML/SL
3 Oct 2024