२८ व्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास आरंभ

 २८ व्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास आरंभ

ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पं. राम मराठे यांचे संगीत क्षेत्राला मोठे योगदान आहे. त्यांनी अफाट गायकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या नावाचा सन्मान मिळणे हा त्यांचा मिळालेला आशीर्वाद मानतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ तबला वादक, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी केले आहे. पं. राम मराठे जीवनगौरव पुरस्काराने पं. तळवलकर यांचा ठाणे महानगर
पालिकेने सन्मान केला त्यावेळी ते बोलत होते.

ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास शुक्रवारी सायंकाळी ठाणेकर रसिकांच्या उदंड प्रतिसादात गडकरी रंगायतनमध्ये प्रारंभ झाला. ज्येष्ठ गायक डॉ. पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी, रंगमंचावर, पं. सुरेश तळवलकर, निषाद बाक्रे, पं. संजय मराठे, ठाणे महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणेकर रसिकांचे प्रेम भरभरुन मिळत असल्याने या शहरात कार्यक्रम सादर करताना नेहमीच आनंद होतो. आज मित्राचा सत्कार करण्यासाठी मी आवर्जून आलो, असे उद्गार या प्रसंगी डॉ. पं. अजय पोहनकर यांनी काढले. पोहनकर यांच्या हस्ते तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना पं. राम मराठे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. रुपये ५१ हजार, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर, पं. राम मराठे युवा पुरस्काराने गायक निषाद बाक्रे यांचा गौरव करण्यात आला. रुपये २५ हजार, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे .

त्याचबरोबर, पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्यासह काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा डॉ. पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्यापैकी, पं. वासुदेव जोशी, पं. प्रदीप नाटेकर, पं. संजय मराठे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सन्मान स्वीकारला. तर, विदुषी शुभदा दादरकर, पं. मधुबुवा जोशी, पं. वाय. टी. वैद्य आणि पं. विश्वनाथ कान्हेरे यांनाही हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

राम मराठे यांचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता सुरू होऊन पहाटे पाचपर्यंत रंगत असे. त्यांच्याकडे अफाट ऊर्जा होती. विविध घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली होती. त्यांच्या नावाचे गुरुकुल ठाण्यात सुरू व्हावे, अशी अपेक्षा याप्रसंगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली. तसेच, साथसंगत करणारा कलाकार हा गाणे सादर करणारा कलाकार आणि रसिक यांचा मध्य असतो. तो प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा साक्षीदार असतो. ही साक्ष जीवनात खूप शिकवत असते. त्यामुळे आम्ही समृद्ध होत असतो, असेही ते म्हणाले.

ML/KA/SL

2 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *