अवकाळी पावसामुळे ९७६ गावातील २ हजार८०७ हेक्टर भात शेतीचे नुकसान!
महाड दि २९ : (मिलिंद माने) कोकणात६ मे महिन्यापासून चालू झालेल्या पावसाने आज ऑक्टोबर महिना संपत आला तरी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच मागील दोन आठवड्यापासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली असून ९७६ गावातील २ हजार
८०७.५२ हेक्टर क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले असून कृषी व महसूल विभागाकडून शेतीचे नुकसानीचे पंचनामे चालू झाले असली तरी नक्की मदत कधी मिळणार हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून गेल्याने शेतकरी हवालदील झाल्याचे चित्र संपूर्ण रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस चालू झाल्याने भारताचे कोठार म्हणून गणल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने वर्षभर काय करायचे या विवांचनेने जिल्ह्यातील शेतकरी हैराण असून शासनाने पंचनामे जरी चालू केले असले तरी नेमकी किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत कोणतेही स्पष्टता नसल्याने शेतीवर झालेल्या खर्चाच्या पोटी शासनाकडून मिळणारी मदत ही तोंडाला पाणी पुसणारीच असणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत १ ऑक्टोंबर पासून२६. ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या मोसमी पावसामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यातील९७६. गावातील८७१६. शेतकरी आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यात बाधित असून जिल्ह्यातील २ हजार ८०७.५२ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील कोणत्या गावात किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांचे हेक्टरवरील क्षेत्र पुढील प्रमाणे;
१)अलिबाग बाधित गावांची संख्या ५६, एकूण बाधित शेतकरी संख्या२२०, ८४.३२ एक्टर क्षेत्र बाधित
२) पेण बाधित गावांची संख्या४५, एकूण बाधित शेतकरी१७५०, ७५०.०० हेक्टर क्षेत्र बाधित
३) मुरुड बाधित गावांची संख्या४४, एकूण बाधित शेतकरी ३१४,८२.९२ हेक्टर क्षेत्र बाधित
४) खालापूर बाधित गावांची संख्या७३, एकूण बाधित शेतकरी३३९, ७३.४४ हेक्टर क्षेत्र बाधित
५) कर्जत बाधित गावांची संख्या २०८, बाधित शेतकरी ४५१,१७१.८६ हेक्टर क्षेत्र बाधित
६) पनवेल बाधित गावांची संख्या ४६, बाधित शेतकरी ११८,३६.४० हेक्टर क्षेत्र बाधित
७) उरण बाधित गावांची संख्या २३, बाधित शेतकऱ्यांची संख्या १७१,४३.७६ हेक्टर क्षेत्र बाधित
८) माणगाव बाधित गावांची संख्या ५३, बाधित शेतकरी ४११,१२५.६७ हेक्टर क्षेत्र बाधित
९) तळा बाधित गावांची संख्या १५, बाधित शेतकऱ्यांची संख्या ९९, १८ हेक्टर क्षेत्र बाधित
१०) रोहा बाधित गावांची संख्या १२०, बाधित शेतकऱ्यांची संख्या २७००,९५० हेक्टर क्षेत्र बाधित
११) सुधागड पाली बाधित गावांची संख्या ४६, बाधित शेतकऱ्यांची संख्या ३१६, १२५.३५ एक्टर क्षेत्र बाधित
१२) महाड बाधित गावांची संख्या ७४, बाधित शेतकऱ्यांची संख्या ६१५, १५८.१५ हेक्टर क्षेत्र बाधित
१३) पोलादपूर बाधित गावांची संख्या ८८, बाधित शेतकऱ्यांची संख्या१३८, १२७ हेक्टर क्षेत्र बाधित
१४) म्हस्ळा बाधित गावांची संख्या ५४, बाधित शेतकऱ्यांची संख्या १६८, ३९.०० हेक्टर क्षेत्र बाधित
१५) श्रीवर्धन बाधित गावांची संख्या ३१, बाधित शेतकऱ्यांची संख्या १०६, २१.४५ हेक्टर क्षेत्र बाधित
रायगड जिल्ह्यासह कोकणात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला असून संपूर्ण भात शेती बरोबर नाचणी व वरी या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शासनाने सरसकट शेतीचे नुकसान धरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ म्हणून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे रायगड जिल्ह्यात विधानसभेचे ७ आमदार असून त्यातील दोन राज्यातील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाचे मंत्री आहेत तर दोन लोकसभेचे खासदार व एक राज्यसभेचे खासदार आहेत.
सर्वच लोकप्रतिनिधी हे सत्ताधारीचे पक्षाचे असतानाही अवकाळी पावसाने नुकसान झाले असताना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे कसे नुकसान झाले आहे याचा पाहणी एकही लोकप्रतिनिधी करताना दिसत नाही यावरून शेतकऱ्यांचे पुत्र म्हणणारे लोकप्रतिनिधी मात्र आलिशान गाड्यांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराच्या निमित्ताने मतदार संघात उद्घाटन, भूमिपूजन, जाहीर सभा व आढावा बैठका तसेच पक्षप्रवेश याच कार्यक्रमात गुंतले असून अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास मात्र एकाही लोकप्रतिनिधीला सुखदुःख नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.