राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही

 राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही

मुंबई, दि. ५ : राज्यातील जुन्या म्हणजेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. राज्य परिवहन विभागाकडे आतापर्यंत जवळपास १ कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ७३ लाख वाहनांना HSRP प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही २७ लाखांहून अधिक वाहनधारकांना प्लेट्सची प्रतीक्षा आहे आणि ही प्रक्रिया पुढील काही आठवड्यांत पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

HSRP बसवण्याची सुरुवातीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ होती, परंतु ती अनेकदा वाढवून अखेर ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा मुदतवाढीबाबत कोणतीही घोषणा नसल्याने आरटीओकडून नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. वर्षाच्या अखेरीस अर्जांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे अधिकृत फिटमेंट केंद्रांवर अपॉइंटमेंट मिळण्यात विलंब झाला आहे.

वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की लवकरच आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून तपासणी सुरू होईल. HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. सुरुवातीला तात्काळ दंडाऐवजी नागरिकांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित केले जाईल. ज्यांनी आधीच अर्ज केला आहे त्यांच्यावर कारवाई होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP बंधनकारक आहे. वाहनांची ओळख अचूक व्हावी आणि वाहनचोरीला आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत वाहनांमध्ये HSRP आधीपासूनच बसवलेले आहेत.

HSRP नसताना वाहन चालवल्यास तात्काळ चालान होऊ शकते. प्रथम उल्लंघन केल्यास दंड १००० रुपयांपर्यंत असू शकतो, तर वारंवार उल्लंघन झाल्यास ही रक्कम ५००० ते १०,००० रुपयांपर्यंत वाढू शकते आणि वाहन नोंदणी निलंबित होण्याचीही शक्यता आहे. तसेच HSRP नसलेले वाहन कायदेशीर निकषांनुसार अपूर्ण मानले जाते, त्यामुळे त्याच्या पुनर्विक्री मूल्यात घट होऊ शकते.

वाहनधारकांनी HSRP बसवण्यासाठी राज्य वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर https://transport.maharashtra.gov.in या ठिकाणी अपॉइंटमेंट बुक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *