मुंबईतील २६ हिरे व्यापाऱ्यांनी केले सुरतला स्थलांतर
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरातील विशेषतः मुंबईतील मोठे उद्योग आणि उपक्रम गुजरातकडे स्थलांतरीत होत आहेत. महानगरी मुंबईसाठी आज अजून एक धक्का देणारी घटना घडली आहे. मुंबईच्या २६ हिरे व्यापाऱ्यांनी आजपासून त्यांचे ऑफिस सुरतला नेण्याचा निर्णय घेतला आहे. सूरत डायमंड बोर्सच्या १३५ कार्यालयाचे आज औपचारिकरित्या उद्घाटन झाले.
१३५ व्यापाऱ्यांपैकी २६ व्यापारी मुंबईचे कार्यालय बंद करून कायमचे सूरतला शिफ्ट झाले आहेत. सूरतमधील डायमंड बुर्स हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी डायमंड बाजाराचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत.
सुरत शहर डायमंड सिटी नावानेही ओळखले जाते. परंतु सुविधांच्या अभावी येथून अनेक व्यापारी मुंबईतून व्यवसाय करतात. आता त्यांची पुन्हा सुरतकडे वापसी होत आहे.सूरतच्या डायमंड बुर्समध्ये एकूण ९८३ कार्यालयं आहेत. सूरत डायमंड बाजारामध्ये व्यापार सुरू करण्यापूर्वी, SBI ने २० नोव्हेंबर रोजी डायमंड बाजारामध्ये एका शाखेचं उद्घाटन केलं आहे.
सूरत डायमंड बोर्सचे काम गेल्या ५ वर्षापासून सुरू होते. या इमारतीत एकावेळी ६७ हजार लोक काम करू शकतात. सूरत डायमंड बोर्समुळे दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.जगभरात १०० प्रकारे हिरे असतात आणि सूरतमध्ये यातील ९० प्रकारचा व्यापार होतो. १७५ देशात हिरे खरेदी केले जातात.
सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात जास्त कार्यालये असणारी मोठी इमारत आहे. याआधी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागनला या इमारतीने मागे टाकले. ६६ लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या इमारतीच्या बांधकामासाठी सूरतचे ४२०० हिरे व्यापारी एकत्र आले आहेत.
SL/KA/SL
21 Nov. 2023