पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर 25 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

 पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर 25 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प


मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव (पश्चिम) पी दक्षिण विभाग कार्यालयाने पर्यावरण संवर्धन व ऊर्जा बचतीच्या उद्देशाने, कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठी करण्यात येणार असून यामुळे दरमहा सुमारे 27 हजार रुपयांची वीज खर्चाची बचत होणार आहे, अशी माहिती पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली.

पी दक्षिण विभाग क्षेत्रात विविध पर्यावरण पूरक बाबींचे नियोजन व व्यवस्थापन नियमितपणे करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर अर्थात ‘टेरेस’वर सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करणारी यंत्रणा (रूफ टॉप सोलर सिस्टिम) कालपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
भविष्याची गरज पाहता, वीजनिर्मितीसाठी पर्यावरणपूरक स्रोतांचा विचार करणे गरजेचे आहे. वीज वाचवण्यासह पर्यावरण पूरकता जपणे आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती साधणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, अशी माहिती सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली.25 KW solar power plant on rooftop of P South Division Office

सद्यस्थितीत पी दक्षिण विभाग कार्यालयात टाटा पॉवर प्रा. लि. मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. या व्यतिरिक्त इमारतीच्या टेरेसवर 25 किलोवॅट क्षमतेचा ऑनग्रीड रुफ टॉप सोलर पॉवर प्लॅन्ट बसवण्यात येवून, त्याद्वारे निर्मित होणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे प्राप्त होणारी विद्युत ऊर्जा ही ‘डीसी’ (Direct Current) प्रकारची आहे. विद्युत पुरवठ्यास आणि विद्युत उपकरणांना ‘एसी’ (Alternating Current) प्रकारची विद्युत ऊर्जा लागत असल्याने सौर ऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त ‘डीसी’ ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम ‘एसी’ मध्ये केले जात आहे. त्यानंतर ही ऊर्जा विद्युत पुरवठादार कंपनीला मीटरच्या माध्यमातून दिली जात आहे. यानुसार विद्युत पुरवठादार कंपनीला जेवढी ऊर्जा जाईल, त्याचे गणन मीटर द्वारे करण्यात येत आहे. सौर ऊर्जा पॅनलद्वारे जेवढी वीज निर्मिती झाली आहे, तेवढ्या विजेची किंमत ही निर्धारित दरानुसार मासिक विजेच्या बिलातून वजा करण्यात येणार आहे.

पी दक्षिण विभाग इमारतीत 25 किलोवॅट ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप प्लांटचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे विशेष (इनोव्हेटिव्ह) प्रकल्प निधी अंतर्गत अक्षय ऊर्जा निर्मिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 25 किलोवॅट क्षमतेच्‍या या प्रकल्पाद्वारे दरमहा साधारणपणे 3 हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे‌. ज्यामुळे दरमहा सुमारे 27 हजार रूपयांच्‍या वीज खर्चाची बचत होणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आयुर्मान हे सुमारे 25 वर्षे इतके आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्‍यासाठी 21 लाख 95 हजार रूपयांचा खर्च झाला असून हा प्रकल्‍प खर्च पुढील पाच वर्षात वसूल होईल, असे श्री. अक्रे यांनी स्पष्ट केले आहे.

ML/KA/PGB
1 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *