२५ कोटींचा ‘आमदार’ रेडा ठरतोय भीमा कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात २५ कोटी रुपये किंमतीचा ‘आमदार’ नावाचा रेडा दाखल झाला आहे. या ‘आमदार’ रेड्याला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होताना दिसत आहे. हा रेडा जगातील सर्वांत उंच रेडा असल्याचा दावा त्याच्या मालकाने केला आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत कोल्हापुरात मेरी वेदर मैदानावर यंदा १७ वे भीमा कृषी प्रदर्शन आयोजीत केले आहे. या प्रदर्शनात हरियाणातील ‘आमदार’ नावाचा मुऱ्हा जातीचा रेडा सर्वांचे आकर्षण बनला आहे. या ‘आमदार’ रेड्याचे वय अवघे ४ वर्ष असून वजन तब्बल १५०० किलो आहे. त्याला देशात कुठेही फिरण्यासाठी एसी वाहनाची खास सोय केली जाते. मुऱ्हा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी एक लाखांचा नुसता खुराकच लागतो.
भरभक्कम शरीरयष्टी, देखणे रूप आणि २५ कोटी किंमत यामुळे हे जनावर नेमके आहे तरी कसे? हे पाहण्यासाठी सध्या कोल्हापूरकरांची अक्षरशः रीघ लागली आहे. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील नरेंद्र सिंह यांच्या या रेड्याची लांबी १४ फूट आहे. त्याची उंची साडेपाच फूट असल्यामुळे ‘आमदार’चे पालनकर्ते नरेंद्र सिंह यांनी हा जगातील सर्वात उंच रेडा असल्याचा दावा केला आहे.
SL/ML/SL
23 Feb. 2025