24 ऑगस्टचा बंद बेकायदेशीर, राजकीय पक्ष महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकत नाही- उच्च न्यायालय
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने शनिवारी (ता.24) घोषित केलेल्या बंदविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ॲड. गुणरत्न सदावर्तें यांच्यासह इतरांनी मविआच्या बंदविरोधात याचिका दाखल केली होती.याचिकेत मविआने विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असा निकाल देत जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आता मुंबईत उच्च न्यायालयाने उद्याचा बंद हा बेकादेशीर असल्याचे म्हटल्याने महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.