केदारनाथमध्ये २,३०० टन कचऱ्याचा डोंगर, स्वच्छतेसाठी २५ कोटींचा खर्च
उत्तरकाशी, दि. १५ : उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ मंदिर यंदा यात्रेकरूंनी अक्षरशः गजबजून गेले. बाबा केदारच्या दर्शनासाठी तब्बल १७.६८ लाख भाविकांनी हजेरी लावली. या विक्रमी गर्दीमुळे मंदिर परिसर आणि गौरीकुंड–केदारनाथ मार्गावर २,३०० टन कचऱ्याचा प्रचंड डोंगर जमा झाला आहे. आकडेवारीनुसार, प्रत्येक यात्रेकरू मागे सरासरी १.५ किलो कचरा सोडून गेला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रति यात्रेकरू कचर्यात १५० ग्रॅमने वाढ झाली आहे.
या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंदाजे २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च फक्त कचरा सोनप्रयागपर्यंत नेण्यासाठी होत आहे. केदारनाथ धाम हे संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्र असल्याने येथे कचरा जाळण्यास सक्त मनाई आहे. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सुविधा उपलब्ध नाही. यंदा जमा झालेल्या कचऱ्यात सुमारे १०० टन प्लास्टिक तर उर्वरित २,२०० टन इतर कचरा होता, जो संपूर्ण मार्गावर पसरलेला होता.
कचरा गोळा करून खाली आणण्याची जबाबदारी खेचरांवर टाकण्यात आली आहे. मात्र, एक खेचर केवळ १०–१२ किलो कचरा वाहू शकते. एका फेरीसाठी १,७०० रुपये खर्च येतो. त्यामुळे लाखो किलो कचरा खाली आणण्यासाठी हजारो फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळेच खर्च कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
या परिस्थितीमुळे केदारनाथ धामासमोर एक गंभीर पर्यावरणीय संकट उभे राहिले आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारा कचरा, त्याची विल्हेवाट लावण्याची मर्यादित साधने आणि प्रचंड खर्च यामुळे प्रशासन चिंतेत आहे. हिमालयातील या पवित्र स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी तातडीने शाश्वत उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
SL/ML/SL
SL/ML/SL