भाजपच्या अधिवेशनासाठी शिर्डीत राज्यभरातून 22 हजार पदाधिकारी
शिर्डी, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर साईनगरीत आज रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडणार असून उद्या रविवारी राज्यस्तरीय अधिवेशनास सकाळी सुरवात होईल. राज्यातून तब्बल 22 हजार पदाधिकारी या अधिवेशनाला येणार आहेत.
आगामी निवडणुका आणि भाजपाचा मोठ्या प्रमाणावर विस्तारणारा परिवार या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. पक्षाच्या पुढील अध्यक्षाचीही या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी पक्षाचा ध्वज फडकावून तसेच प्रतिमा पूजनाने अधिवेशनाचा श्रीगणेशा होईल तर सायंकाळी पाच वाजता अमित शहांच्या भाषणाने समारोप होईल. त्या आधी ग्रुहमंत्री शाह हे शनि शिंगणापूर आणि साई समाधीचे दर्शन घेतील.
शाह यांच्या हस्ते यावेळी संविधान पूजनही करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. मंडप, स्टेज, बैठक, भोजन, वाहनतळ, निवास, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
ML/ML/SL
11 Jan. 2025