मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत २,५१७ रुग्णांना २२ कोटींची मदत

 मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत २,५१७ रुग्णांना २२ कोटींची मदत

मुंबई, दि १ :– राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरजूंसाठी मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जाते. मार्च महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत तब्बल २५१७ रुग्णांना तब्बल २२ कोटींहून अधिकची मदत करण्यात आली असून सर्वाधिक मदत ही मेंदू विकारांवरील उपचारांसाठी करण्यात आली असल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.

आरोग्य सहाय्याचा होत आहे विस्तार

मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी ४७१ रुग्णांना मदत करण्यात आली. तसेच कर्क रोगावरील उपचारांसाठी ४२१ रुग्णांना, हिप रिप्लेसमेंटच्या ३०६ रुग्णांना, अपघातामधील शस्त्रक्रियेसाठी २४७ रुग्णांना, हृदय विकारांवरील उपचारांसाठी २३९ रुग्णांना, अपघाता संबंधित १८४ रुग्णांना, नी रिप्लेसमेंटच्या १५० रुग्णांना, बाल रोगांवरील उपचारांसाठी १४५ रुग्णांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.

रुग्णांसाठी दिलासा ठरत आहे कक्षाचा मदतीचा हात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत मिळत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या रुग्णांसाठी हा मदतीचा हात त्यांचे दुःख हलके करण्याचे कार्य करतो, असे भावनिक उद्गार अनेक लाभार्थी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.

अधिकाधिक गरजूंना मदत मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत सहाय्याची रक्कम पोहोचवली जात आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सढळ हाताने मदत करावी जेणेकरून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना आर्थिक मदत करता येईल. राज्यातील गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कक्षाद्वारे देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच, या कक्षाद्वारे देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *