2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान
नवी दिल्ली, दि. १६ : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण 11 पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्य कृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यात त्यांनी आपल्या चित्रकला प्रवासासोबतच वंचित वर्गातील संघर्षाचे चित्रण केले आहे. त्यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या पुस्तकाचा समावेश एमएच्या अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे.
राजू बाविस्कर हे एक प्रसिद्ध मराठी चित्रकार आणि लेखक आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना सन्मानचिन्ह (कोरीव ताम्रपट), शाल आणि 1 लाख रुपये रोख रक्कम पुरस्काराच्या स्वरुपात दिली जाईल. 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.