खाद्यतेलावरील आयात शुल्कात २० % वाढ
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र येत्या काळात दसरा, दिवाळी या सणांच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेल ( Edible Oil ) महागणार आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.
PTI च्या वृत्तानुसार सरकारने क्रूड, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल ( Edible Oil ) महागणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती. म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आलं आहे. तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलांवर बेसिक ड्युटीचे दर वाढवून ३२.५ टक्के करण्यात आले आहे. हा बदल सप्टेंबर महिन्यातच होणार आहे. त्यामुळे खाद्य तेल ( Edible Oil ) महाग होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार कस्टम ड्युटी वाढवल्यानंतर सर्व खाद्य तेलांवरील प्रभावी शुल्क वाढून ३५.७५ टक्के इतके होणार आहे. क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवरील प्रभावी शुल्क दर आता ५.५ टक्क्यांनी वाढून २७.५ टक्के होणार आहे. तेच रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन तेलावरचं प्रभावी शुल्क आता १३.७५ टक्क्यांवरुन आता ३५.७५ टक्के इतकी होणार आहे.
SL/ML/SL
14 Sept 2024