मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी 2 हजार कोटींची निविदा

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील साडपाण्याचा भार वाहता वाहता मिठी नदीचे गलिच्छ नाल्यात रुपांतर झाले आहे. श्रद्धानंद नाला, लेलेवाडी नाला, ओबेरॉय नाला, कृष्णनगर नाला, जरीमरी नाला आणि वाकोला नाला हे सहा नाले या नदीला मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आता शासनाकडून महत्त्त्वापूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. मिठी नदीची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई पालिकेने मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. चार टप्प्यात हे पुनरुज्जीवन काम होणार आहे. यातील तिसऱ्या टप्प्यासाठी निविदा काढण्यात आली असून या कामाचा अंदाजित खर्च २३९४ कोटी इतका असणार आहे.
मिठीच्या तिसर्या टप्प्यातील कामामध्ये उर्वरित ३०० मीटर नदीचा विस्तार आणि खोलीकरण, ६७८० किमीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम, नदीकिनारी ८८५० मीटरचा प्रेक्षणीय मार्ग आणि २५ ठिकाणी पूर नियंत्रणासाठी गेट उभारणी, ६,४२१ मीटर सेवा रस्ता आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी अंदाजे २,३९४ कोटी खर्च अपेक्षित आहे. ही कामे सीएसटी रोड, कुर्ला ते माहीम कॉजवे दरम्यान केली जाणार आहेत. ही कामे करताना नदीलगतची अतिक्रमणे हटविणे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे काम चार टप्प्यांत विभागले गेले आहे. तिसऱ्या टप्प्यात मुख्यत्वे मिठी आणि वाकोला नाल्यातून येणाऱ्या २६ ठिकाणच्या सांडपाण्याचा प्रवाह अडवून मुख्य जलनिःसारण योजनेशी जोडले जाणार आहे.
SL/ML/SL15 Feb. 2025