कोकण रेल्वे मार्गावर ३१ मे ला अडीच तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील दुर्गम डोंगरकपारीतून वाट काढत जाणारी कोकण रेल्वेची उभारणी ही आजही एक आश्चय मानले जाते. दक्षिण भारताला कोकणशी जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गावर पावसाळ्यापूर्वी आपत्तीनियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली जातातय यावर्षी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते ११.४० या वेळेत कोकण रेल्वेने हा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. कोकण रेल्वेमार्गावरील तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकाची प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी ३१ मे रोजी रत्नागिरी ते वैभवाडी रोड स्थानकादरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस (१०१०६) या गाडीचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड – वैभववाडी रोड स्थानकादरम्यान ८० मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास चिपळूण – रत्नागिरी स्थानकादरम्यान ४० मिनिटांसाठी स्थगित केला जाणार आहे. तसेच मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे.
SL/ML/SL
27 May 2024