मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशाची १ ली विशेष प्रवेश यादी जाहीर
मुंबईदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज जाहीर करण्यात आली आहे. विविध महाविद्यालयांतील १ लाख ९७ हजार ६४८ जागांसाठी १ लाख ३ हजार १५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९० हजार ४०० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. पहिल्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या १२ हजार ७५४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तब्बल ६५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १० हजार ७३३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ५ हजार २९२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.
शाखानिहाय उपलब्ध जागा आणि निवड झालेले विद्यार्थी
शाखा – उपलब्ध जागा – निवड झालेले विद्यार्थी
कला – २८ हजार ५०७ – ७ हजार २५०
वाणिज्य – १ लाख ३ हजार ४०९ – ४८ हजार १८७
विज्ञान – ६२ हजार ७३१ – ३४ हजार १४५
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – ३ हजार १ – ८१८
एकूण – १ लाख ९७ हजार ६४८ – ९० हजार ४००
पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण हे (कट ऑफ) नव्वदीच्या उंबरठ्यावरच राहिले होते. मात्र, पहिल्या विशेष प्रवेश फेरीत नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुणांत मोठी घट झाली आहे. कला शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांत ५ ते ७ टक्के, वाणिज्य शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांत २ ते ३ टक्के आणि विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची घट झालेली आहे. सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही.
पहिल्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा.
SL/ ML/ SL
5 August 2024
SL/ ML/ SL